“आई! वाघ!” ती किंचाळली,
पिंजऱ्याभोवती मला शोधू लागली.
मी गुरगुरलो, दात विचकले,
ती मात्र आणखी टाळ्या वाजवू लागली.
का बरं मी यांना घाबरवू शकत नाही?
हाच विचार मनाला सर्वाधिक बोचतो.
एकेकाळी माझ्या गर्जनेने जंगल थरथर कापायचं,
क्षणात भयाचं सावट सर्वदूर पसरायचं.
ससे जीव मुठीत धरून पळायचे,
बेडूक घाबरून उड्या मारायचे,
पक्षी दचकून नभात झेप घ्यायचे,
उंदीर बिळात जाऊन लपायचे.
वाटा ओस पडायच्या,
प्राणी भीतीने थरथरायचे.
माझ्या प्रत्येक पावलाने धरती हादरायची,
अहाहा… ते दिवस पुन्हा यावेत, मन आतुरतेने वाट पाहतं.
दाट झुडपांच्या सावलीत मी दबा धरून बसायचो,
योग्य क्षणाच्या प्रतीक्षेत.
माझी गर्जना आकाशाला भिडायची,
आणि संपूर्ण जंगल भयाने थरथरायचं.
पण आता… काहीच समजत नाही,
या दोन पायांच्या जीवांनी नेमकं काय केलं?
माझं अथांग जग इतकंसं कसं झालं?
आणि मी इथे कसा येऊन पोहोचलो—
एकेकाळचा अभिमानी, रुबाबदार जंगलाचा राजा असूनही?
“ही कविता मूळतः इंग्रजीमध्ये लिहिलेल्या कवितेचा मराठी अनुवाद आहे. मूळ कवितेतील भावना, अर्थ आणि सौंदर्य जपून मराठी वाचकांसाठी प्रेमपूर्वक अनुवादित करण्यात आली आहे.”
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.